आॅनलाईन

 ऑनलाइन

  सोशल मीडियाद्वारे तंत्रज्ञानाचा होत असलेला वापर आणि गुलामी यात फरक असा आहे की गुलामांना माहिती असतं कि ते स्वतंत्र नाहीत.

   या तंत्रज्ञानामुळे अर्थात त्याच्या अयोग्य वापरामुळे येणाऱ्या पारतंत्र्याचा विचार केल्यास तरुण पिढी यात अधिक गुंतल्याची दिसते .खरे पाहिल्यास सर्वच वयोगटावर सोशल मीडियाच्या अति आणि अनावश्यक वापराचा परिणाम दिवसेंदिवस वाढतोच आहे. मात्र लहान मुले व तरुणांवरचा हा परिणाम त्यांच्या आयुष्याचा प्रश्न बनतो. त्यामुळे अधिक धोकादायक आहे. जडणघडणीच्या, वाढीच्या वयातच सर्वांगीण विकास खुंटतो, त्यामुळे विशेषतः कुमारवयीन व तरुणांमधील मोबाईलफोन, टीव्ही, कम्प्युटरचा अति व अयोग्य वापर चिंतेचा विषय ठरतो.

 बरेचदा अनेक माणसे एका ठिकाणी बसलेली दिसतात. ती मुकी नसतात ,लाजरीबुजरी नसतात ,अनोळखीही नसतात तरीही त्यांच्या तोंडून चकार शब्द बाहेर पडत नाही. कारण ती सगळी दिवा लागलेल्या आयताकृती यंत्राकडे टक लावून बसलेली असतात. किती सामान्यपणे हे दृश्य दिसायला लागले आहे हल्ली!

   यालाच "स्क्रीन अडिक्शन" अर्थात दृश्य माध्यमांच्या आहारी जाणे म्हटले जाते. यामुळे त्या व्यक्तीमध्ये तीव्र व अनावर इच्छा होते ती म्हणजे सतत ऑनलाइन राहण्याची, वारंवार स्क्रीनवर काय आहे ते बघण्याची -इतकी की नित्यकर्मांमध्ये त्यामुळे व्यत्यय येतो आणि असे थोड्या थोड्या वेळाने ऑनलाईन राहता न आल्यास त्यांच्यात कमालीची अस्वस्थता निर्माण होते. आयुष्यातील अतिशय महत्वाचा भाग म्हणून या आंतरजालाकडे बघितले जाते. चिंता ,दुश्चिंता, एकाकीपणा घालवण्यासाठी बरेचदा व्यक्ती या मायाजालाकडे आकृष्ट होते. या तंत्रज्ञानावर आधारित माध्यमांवरचे अति अवलंबित्व तरुणांना खऱ्या आयुष्यात सामाजिक देवाण-घेवाणीत बाधा आणू शकते आणि मेंदू मधील रसायनांमध्ये अस्थिरता निर्माण करू शकते .

पुढील लक्षणे विशेषतः तरुणांमध्ये अधिक प्रमाणात दिसल्यास ती धोक्याची घंटा समजावी  १) स्क्रीनचा वापर नियंत्रणात नसणे  २) इतर कुठल्याही गोष्टी खेळ वाचन फिरायला जाणे इत्यादींमध्ये रस नसणे  ३) विचार सतत स्क्रीनवर दिसणाऱ्या गोष्टींबद्दलच करणे उदा व्हिडिओ गेम खेळत नसतील तरी त्याबद्दल सतत बोलत राहणे। ४) इतरांशी बोलणे भेटणे आणि संपर्क टाळणे ५) कौटुंबिक समस्या निर्माण होऊ शकतात नातेसंबंध दुरावतात ६) स्क्रीन पासून दूर होण्याच्या वेळेला अशी व्यक्ती अस्वस्थ होते उदा टीव्ही बंद करून झोपायला जाताना, एकत्र बसून बोलताना मोबाईल बाजूला ठेवताना ,अशा व्यक्ती नाराज होतात चिडचिड करतात ७) कम्प्युटर, टीव्ही ,मोबाईलच्या वापराबद्दल खोटे बोलणे. रात्री उशिरा घरच्यांच्या नकळत त्याचा वापर करणे ८) बाहेरून घरी आल्यावर सर्वप्रथम टीव्ही ,व्हिडिओ गेम सुरू करणे .

वरील सर्व लक्षणे त्या व्यक्तीला स्क्रीनचे व्यसन जडल्याचे सूचक असतात. वेळीच उपाय योजना न केल्यास विशेषतः कुमारवयीन मुलांमध्ये त्यांच्या मेंदूवर परिणाम होऊ शकतो. रचनात्मक आणि क्रियात्मक घातक परिणाम मेंदूमध्ये दिसू शकतात. मेंदूचा पुढचा भाग हा प्रामुख्याने प्राधान्यक्रम ठरवणे ,योजना ठरविणे ,स्वनियंत्रण या घटकांशी संबंधित कार्य करतो. त्यातील इंसुला नावाच्या भागावर विशेषतः स्क्रीन अडिक्शन चा वापर होऊन इतरां बद्दल भावनिक जवळीक ,आपुलकी, सहनशीलता या गुणांची कमतरता जाणवायला लागते .थोडक्यात ही मुले कोडगी व्हायला सुरवात होऊ शकते .अति प्रमाणात घातक परिणाम करणाऱ्या या व्यसनाचा सामना करण्यासाठी आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी स्वनियंत्रण आणि दैनंदिन जीवनात शिस्त याला महत्व आहे.

 यासाठी पुढील गोष्टींचा उपयोग होऊ शकतो १) वापर करण्यावर नियंत्रण -व्यसनाधीनतेची पातळी गाठण्याआधीच वापर नियंत्रित ठेवावा .मुलांचा या माध्यमांचा वापर सुरू होण्यापूर्वी त्यांची नित्यकर्मे ,दैनंदिन अभ्यास ,व्यायाम, कुटुंबातील व्यक्तींसोबत पुरेसा वेळ घालवणे याची पूर्तता झालेली असावी २) वापर बंद ठेवणे- कधीकधी स्क्रीनच्या वापरावर पूर्णतः बंदी आणावी लागते .अशावेळी मुले संतापतात, आदळ आपट करतात मात्र पालकांनी त्या बाबतीत आपली भूमिका निश्चित आणि ठाम ठेवून काही काळ जाऊ द्यावा लागतो ३) स्क्रीनचा वापर करण्याऐवजी इतर गोष्टींकडे मुलांचे लक्ष वळविणे ,त्यांना आवडू शकणाऱ्या इतर गोष्टी करण्यास प्रोत्साहन देणे  ४) फोन वर मेसेज पाठवण्यापेक्षा प्रत्यक्ष बोलणे आणि प्रत्यक्ष भेटणे जास्त प्रमाणात होईल यासाठी प्रयत्न करणे ५) घरातील मोठ्यांनीही स्वतः दृक्श्राव्य प्रसार माध्यमांचा वापर जबाबदारीने वेळेचे बंधन, सामाजिक भान सांभाळत करावा. 

लहान मुले, तरुण भोवताली घडणाऱ्या गोष्टींबद्दल अधिक संवेदनशील असतात .काय चांगले काय वाईट हे त्यांना वारंवार सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीतून दाखवण्याची जबाबदारी संपूर्ण समाजाची आहे.


 डॉ वर्षा देशपांडे 

आयुर्वेद तज्ञ व समुपदेशक

फोन९८२३७८९८५३

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा